Home Cities जळगाव गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात शुक्रवारी मोठ्या उत्साहात पदवीदान समारंभ पार पडला. या सोहळ्यात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग (बीएस्सी), पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग (पी.बी.बीएस्सी) पदवी आणि मास्टर ऑफ सायन्स इन नर्सिंग (एमएस्सी) पदविका प्राप्त केलेल्या १५७ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन.एस. आर्विकर (संचालक, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल) उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. प्रशांत सोलंकी (डीन), डॉ. प्रेमचंद पंडित (वैद्यकीय अधीक्षक), महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. जस्निथ दया, प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. मनोरमा इसाक, प्रा. मिनोव देवी, प्रा. अश्विनी मानकर, प्रा. पियुष वाघ आणि प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

समारंभाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर, यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या आणि प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या शैक्षणिक प्रवासातील या महत्त्वपूर्ण टप्प्यावर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या शिक्षक तसेच पालकांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आजचा दिवस तुमच्या शैक्षणिक जीवनाचा शेवट नसून, आरोग्यसेवेतील एका यशस्वी प्रवासाची ही पहिली पायरी आहे. लक्षात ठेवा, ही सेवा हीच खरी साधना आहे.”

याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी संदेशात विद्यार्थ्यांना जीवनात सेवाभाव, रुग्णांप्रति सहानुभूती आणि व्यावसायिक नैतिकता या मूल्यांचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला. या शानदार समारंभाच्या यशस्वी आयोजनात प्रा. मनोरमा इसाक, प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. प्रियांका गवई, प्रा. श्वेता लांडगे आणि प्रा. गिरीश खडसे यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व पदवीधर विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे सामूहिक छायाचित्र घेण्यात आले.


Protected Content

Play sound