भुसावळचा रिद्धेश बेंडाळे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडसाठी पात्र!

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील १२ वीत शिकणारा विद्यार्थी रिद्धेश बेंडाळे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश मिळवले आहे. त्याची आगामी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड (आयपीएचओ) २०२५ साठी निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जुलै महिन्यात होणार असून, रिद्धेश या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची निवड होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन, मुंबई या संस्थेने केली आहे.

रिद्धेश हा भुसावळ शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अनंत बेंडाळे आणि कान नाक घसा तज्ञ डॉ. पंकजा बेंडाळे यांचा मुलगा आहे. त्याने आपल्या अथक परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ज्यामुळे भुसावळ शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अभिमान वाटत आहे.

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये भारताकडून केवळ पहिल्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि रिद्धेशने या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल रिद्धेशने आपले पालक, त्याचे ज्येष्ठ बंधू अथर्व यांचे मार्गदर्शन आणि आपल्या शिक्षकांचा सततचा पाठिंबा मोलाचा असल्याचे सांगितले आहे.

रिद्धेशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी, डॉ. वैभव, डॉ. अनिकेत आणि डॉ. अक्षता पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच, त्याच्या पुढील वाटचालीस आणि पॅरिसमधील स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रिद्धेशच्या या यशामुळे भुसावळच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content