चाळीसगावच्या ग्रेस अकॅडमीतील मुख्याध्यापक अनधिकृत

विश्‍वस्त संजय बारीश यांचा आरोप

चाळीसगाव दिलीप घोरपडे । चाळीसगाव येथील हिरापूर रोड सबस्टेशन भागात असलेल्या ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक पदावर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अनाधिकृतपणे बाबा बारिश हे कुठलीही मान्यता नसताना काम पाहत असल्याचा आरोप या संस्थेचे ट्रस्टी संजय बारीश यांनी केला आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधीत संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असून अनेक वर्षापासून या संस्थेचे कुठलेही ऑडिट केले जात नसून ऑडिटरला योग्य ते कागदपत्र पुरविले जात नसल्याने ऑडिटर मागणी करूनही ही कागदपत्रे जाणीवपूर्वक पुरवली जात नाहीत. याबाबत आपण वेळोवेळी शिक्षण विभागात तक्रारी केल्या असून नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद जाधव तसेच जळगावचे महाजन साहेब यांच्याकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या असून त्यांनी मुख्याध्यापक पदाची कुठलीही मान्यता नसल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचे संजय बारी यांनी सांगितले आहे. ही संस्था पूर्ण बारिश कुटुंबीयांनी छोट्याशा राहत्या घरात उघडली असून त्यासाठी सर्व परिवाराने कष्ट घेतलेत मात्र संस्था मोठी व कमाईचे साधन झाल्यानंतर बाबा बारिश यांनी आपल्या पत्नीला हाताशी धरून संस्था संपूर्णपणे बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेच्या आवारात ट्रस्टींना अपमानास्पद वागणूक दिली जात असते तर गलिच्छ भाषेत शिवीगाळही केली जाते. जेणेकरून ट्रस्टींनी या आवारात पाय ठेवू नये असा या मागचा उद्देश त्यांचा आहे. त्यांची पत्नी या शाळेत कोणत्याही पदावर मान्यता नसताना सुपरवायझर म्हणून काम पाहतात. त्याच प्रमाणे दोन एकर जागेवर झालेल्या या संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाचे खडकी ग्रामपंचायतीकडून ना हरकत किंवा परवानगी घेतलेली नसल्याने हे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैर व्यवहार सुरू असून याबाबत संपूर्ण तपशील ते लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content