नवी दिल्ली । एकीकडे नीट व जेईई परीक्षा तूर्तास घेऊ नयेत अशी विरोधकांनी मागणी केली असतांना आता जगभरातील दीडशे शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून या दोन्ही परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे सूचित केले आहे.
कोरोना आटोक्यात आला नसल्याने एकीकडे केंद्र सरकार लोकांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे जेईई (मेन) आणि नीट परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. तसेच, अनेक राजकीय पक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नीट व जेईईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतांना भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा जेईई (मेन) आणि नीट या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होईल, अशी भिती शिक्षणतज्ज्ञांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
यात म्हटले आहे की, काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे. मात्र, त्यांच्या पुढील वाटचालीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेशाबाबत आणि अन्य प्रक्रियांबाबत अनेक शंका असून त्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजेत. परीक्षेचे आयोजन करण्यात होणार्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या बहुमोल असं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. आपले तरूण आणि विद्यार्थी यांची स्वप्न आणि त्यांचे भविष्य यावर कोणतीही तडजोड होता कामा नये. काही लोक केवळ आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी आणि सरकारचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रत्न करत आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.
याशिवाय, केंद्र सरकार संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन जेईई (मेन) आणि नीट परीक्षांचे आयोजन करेल. मात्र, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून २०२०-२१ या वर्षासाठी अॅकॅडमिक कॅलेंडर तयार केले पाहिजे, असेही या पत्रात म्हटले आहे.
या पत्रावर दिल्ली विद्यापीठ, इग्नू, लखनौ विद्यापीठ, जेएनयू, बीएचयू, आयआयटी दिल्ली, लंडन विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, हिब्रू विद्यापीठ आणि इस्रालयच्या बेन गुरियन विद्यापीठातील प्राचार्यांनी स्वाक्षरी केली आहे.