जळगाव जिल्ह्यात शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू करावे – आ. एकनाथराव खडसे


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय गेली नऊ वर्षे रखडत असल्याने विद्यार्थ्यांचे आणि शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद अधिवेशनात ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनी ही संस्था तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी करत शासनाचे लक्ष वेधले.

अधिवेशनात बोलताना खडसे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळाली होती. महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व मान्यता देखील मिळाल्या आहेत. यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे तब्बल ६० एकर जागा अधिग्रहित करून ती महाविद्यालयाच्या नावावर करण्यात आली आहे. महाविद्यालय उभारण्यासाठीची जमीन उपलब्ध असूनही पुढील प्रक्रिया अडकून पडल्याने ते अद्याप सुरू झालेले नाही.

ते पुढे म्हणाले की, महाविद्यालय सालबर्डी येथे की जळगाव येथे सुरू करावे, असा अनावश्यक वाद काही जणांनी उपस्थित केला आणि या प्रश्नामुळेच कामाचा वेग मंदावला. तथापि, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्र्यांनी सभागृहात वेळोवेळी आश्वासने दिल्यानंतरही आजपर्यंत प्रत्यक्षात काही घडले नाही. नऊ वर्षे उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना आणि जिल्ह्यातील पशुपालकांना महत्त्वाचे शैक्षणिक व तांत्रिक साधन उपलब्ध होत नसल्याने नाराजी वाढली आहे.

खडसे यांनी स्पष्ट केले की, “कॉलेज कुठेही करा, पण ते जळगाव जिल्ह्यातच सुरू करा. आणि लवकरात लवकर सुरू करा.” सध्या राज्यभरात केवळ सहा शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालये असून हे नवीन महाविद्यालय सातवे ठरणार आहे. पशू चिकित्सकांची वाढती मागणी लक्षात घेता हे महाविद्यालय सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. जिल्ह्यातील शेतकरी, दुग्धव्यवसायिक आणि पशुपालकांसाठी हे महाविद्यालय महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

खडसे यांनी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी सभागृहात केली.