जळगाव विशेष प्रतिनिधी । सामान्य परिस्थितीमध्येही नानाविध कारणांनी आणि हेकेखोर अनास्थेने बदनाम झालेल्या जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालायाचा (सिव्हिल हॉस्पिटल) आणखी एक भेसूर चेहरा आज समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मरणानंतरही कसा सरकारी छळ केला जातो हे त्यातून दिसून आले आहे. या अत्यंत संतापजनक घटनाक्रमाचा व्हिडीओ मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल करून या सरकारी अनास्थेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यावर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तो शवविच्छेदान गृहात आणून ठेवला त्यानंतर अपेक्षेप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी पुढे तो अंत्यविधीसाठी ताब्यात घेऊन काळजीपूर्वक स्मशानात घेऊन जाणे अपेक्षित असते असे सांगितले जाते. मात्र या पुढच्या सोपस्कारांसाठी तेथे एकही महापालिका कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे पीपीई किट, सानेटायझर अशी दक्षतेची काहीच साधने जवळ नसलेल्या मृताच्या नातेवाइकांनाच मृतदेह शवविच्छेदन गृहातून आणू शवाहिकेत ठेवावा लागला. रुग्णालयातून निघाल्यावर रस्त्याने शववाहिकेचे दरवाजे सताड उघडलेले होते ते रस्त्यावरच्या अन्य लोकांनी सांगितल्यावर चालकाने उतरून व्यवस्थित बंद केले.
पुढे स्मशानात महापालिकेच्या ठेकेदारांचा फक्त एकच कर्मचारी असल्याचे लक्षात आल्यावर मृताच्या नातेवाइकांनाच मृतदेह शववाहिकटून काढून सरणावर ठेवावा लागला . शवविच्छेदन गृहात आणि स्मशानात या नातेवाईकांना मोठा जीवाचा धोका पत्करून हे काम करावे लागले पण घरातील व्यक्ती गेल्याच्या दुःखात त्यांची मनस्थिती अशा काळजी घेण्याच्या विचाराची नसते; आणि नेमका याचाच फायदा प्रशासनातील निर्ढावलेले लोक घेत आहेत.
कालांतराने या सामान्य कुटुंबातील लोकांचे निदान कोरोना पॉजिटीव्ह झाले तरी त्याची मोजदाद प्रशासन अन्य रुग्णामध्ये करिन पण त्यांना या आजाराची लागण होण्यास आपला नालायकपणा कारणीभूत आहे हे कदापिही मान्य करणार नाही . या प्रश्नाची उत्तरे सामान्यांनी विचारायची कुणाला हा कोरोना एवढाच जळगावतील जटिल प्रश्न आहे. स्मशानात जे कर्मचारी हजर होते त्यांनी आमची नेमणूक ठेकेदाराने केलेली असल्याची सांगत अशाच मृतांच्या आप्तस्वकीयांकडून मिळणाऱ्या वरच्या पाचशे सातशे रुपयांत आम्ही भागवून घेतो असे सांगितल्याचे या व्हिडीओमधून दिसते आहे.
कोरोना मृतांच्या बाबतीत महापालिका आणि रुग्णालय प्रशासन असे बेफिकीर असेल तर रुग्णवाढीने आधीच बदनाम झालेला जळगाव जिल्हा आवाक्यात कधी येणार याचे उत्तर कदाचित परमेश्वरही देऊ शकणार नाही. यापूर्वी अशी वेळ किती मृतांच्या आप्तस्वकीयांवर आली असेल त्याची आतापर्यंत ना दाद ना पुकार; अशी परिस्थिती असेल तर येथील जिल्हा प्रशासनाला काही नेमके टार्गेट (लक्ष्य) यमदूतानेच दिले आहे का?, असा प्रश्न पडावा, अशी ही छळ कहाणी जळगाव जिल्ह्याच्या नशिबी आली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल करून या सरकारी अनास्थेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2348932285401264/