नांदेड प्रतिनिधी | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य सेवेच्या भरती प्रक्रियेतील केलेला घोळ पाहता त्यांची भविष्यातील जागा जेलमध्ये असेल अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारात बोलतांना त्यांनी सरकारवर टीका केली.
सध्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याने बळीराजा जेरीस आल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टार्गेट केले. ते म्हणाले की, पहिल्यांदाच बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असतांना आरोग्य सेवेच्या परिक्षेबाबत झालेला गोंधळ हा अतिशय भयंकर या प्रकारातील आहे. लाखो विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी तयारी केली असतांना रात्री उशीरा आरोग्यमंत्र्यांनी परीक्षा रद्द केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. यात खूप मोठा घोळ असून यामुळे भविष्यात राजेश टोपे हे जेलमध्ये दिसतील असा इशारा त्यांनी दिला.