मुंबई प्रतिनिधी | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारविरूध्द आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. या पार्श्वभूमिवर, त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलं आहे की, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणार्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूनं उभं राहिल्यानं यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी. त्यांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या, असं या पत्रात म्हटलं आहे.