एसटी कर्मचार्‍यांना निर्वाणीचा इशारा

मुंबई प्रतिनिधी | वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी संप करणार्‍या कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे अन्यथा अजून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा एसटी महामंडळातर्फे देण्यात आला आहे. तर आज देखील संप सुरूच असल्याने या प्रकरणाचा तिढा वाढल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्याने महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २०५३ एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यापाठोपाठ महामंडळात रोजंदारीने काम करणार्‍या अडीच हजार कर्मचार्‍यांपैकी २२९६ कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही वाढू लागली आहे.

दरम्यान, कर्मचार्‍यांनी संप मागे घेऊन तात्काळ कामावर रूजू व्हावे असे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहे. मात्र या आदेशला झुगारून लावत आज देखील संप सुरूच असल्याचे दिसून आले आहे.

Protected Content