जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार येथील दुकानाची भिंत फोडून चोरट्याने आत प्रवेश करीत दुकानातील रोख ४० हजार रुपयांसह २० हजार रुपये किमतीचा सुकामेवा, मसाले असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
हरिचंद्र कन्हैयालाल ललवाणी (वय -५४, रा. गणेशनगर) यांचे दाणाबाजारात सतगुरु ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिवाळी सणामुळे दुकानात सुकामेव्यासह इतर माल भरलेला आहे. गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी रात्री ललवाणी हे दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या दुकानाच्या भिंतीला छित्र पाडल्याचे लक्षात आले. दुकानात पाहणी केली असता दुकानातील ४० हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपये किमतीचा सुकामेवा, मसाले अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
या प्रकरणी ललवाणी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी करीत आहेत.