Home Cities भडगाव गोंडगाव अत्याचार प्रकरणावरून राजकीय वाद पेटला; स्थानिक आमदार अपयशी : भाजप नेते...

गोंडगाव अत्याचार प्रकरणावरून राजकीय वाद पेटला; स्थानिक आमदार अपयशी : भाजप नेते अनिल वाघ 

0
7


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणाला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अनिल वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच या प्रकरणात विधानसभेत ठोस आवाज उठवला गेला नसल्याचा आरोप करत जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर न्याय मिळाला नाही तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिनांक २९ जून २०२६ रोजी नसरापूर येथील चिमुकलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषीला अवघ्या ६० दिवसांत फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल विशेष जलद गती न्यायालयाचे तसेच महायुती सरकारचे भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या जलद निर्णयामुळे समाजात गुन्हेगारांवर कठोर संदेश जाईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. याच संदर्भाचा आधार घेत भडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल वाघ यांनी गोंडगाव प्रकरणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, २०२३ साली घडलेल्या या प्रकरणात एका ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती आणि विविध स्तरांवर मोर्चे काढण्यात आले होते.

या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय पातळीवर आंदोलन झाले होते, तसेच व्यापारी वर्गाने भडगाव बंद ठेवून निषेध नोंदवला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्कालीन सरकारने जलद गती न्यायालय स्थापनेचे आणि विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप न्याय मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

अनिल वाघ यांनी पुढे आरोप केला की, स्थानिक आमदारांनी या संवेदनशील प्रकरणावर विधानसभेत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. उलट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आमदारांकडून गैरवर्तन झाल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात राजकीय उदासीनता आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली भूमिका दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले. गोंडगाव प्रकरण जलद गती न्यायालयात खरोखर सुरू आहे का, विशेष सरकारी वकील नेमण्यात आला आहे का, तसेच केवळ राजकीय हेतूने जनतेची दिशाभूल केली जात आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जर तातडीने न्याय मिळाला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने भडगाव तालुक्यात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound