दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडीची सुवर्णसंधी !


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहावी आणि बारावीची परीक्षा दिल्यानंतर ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असतो. या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा मिळावी, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे.

मार्च २०२५ पासून संस्थेने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘मानसशास्त्रीय कसोट्यांचे’ मोफत आयोजन केले आहे. या कसोट्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमता, व्यक्तिमत्त्वाचा प्रकार, आवडीनिवडी आणि योग्य करिअरची दिशा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. या विश्लेषणातून विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याबद्दल अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वास मिळेल.

आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या निःशुल्क सेवेचा लाभ घेतला असून, आपले करिअर अधिक स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे निर्णय त्यांच्या आयुष्याच्या यशाचा पाया ठरतात, त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी, इच्छुक विद्यार्थी किंवा पालकांनी 75888 13270 किंवा 94058 03691 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे अधिव्याख्याता डॉ. प्रतिभा भावसार यांनी कळवले आहे. ही एक महत्त्वपूर्ण संधी असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती निश्चितच उपयुक्त ठरेल.