जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ३१ मार्च रोजी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर ९३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दरही १ लाख ५ हजार रुपयांवर गेला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला मोठी मागणी असल्याने, सुवर्णनगरीत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकाच दिवसात ८०० रुपयांनी महागले सोने
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. मात्र, दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सोन्याचा भाव ९३ हजार रुपयांवर, तर चांदीचा भाव १ लाख ५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढले असले, तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तामुळे सोने-चांदीच्या विक्रीत वाढ झाल्याचे प्रमुख ज्वेलर्सनी सांगितले.
महिला ग्राहकांची प्रतिक्रिया
गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या महिला ग्राहकांनी सांगितले की, “सोन्याचा भाव वाढला असल्यामुळे गुढीपाडवा झाल्यावर दर कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. आज जेव्हा सोने खरेदी करायला दुकानात आलो, तेव्हा भाव ९३ हजारांवर गेला आहे. सोन्याचे आणि चांदीचे दर कमी व्हावेत, अशीच अपेक्षा आहे.” जळगावची सुवर्णनगरी सोने-चांदीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथे मोठी उलाढाल होते. यावर्षीही मुहूर्तावर सोन्याला मोठी मागणी असल्याने, २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.