शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्र उत्सव आणि श्रीराम नवमी उत्सवाला रविवारपासून मंगलमय प्रारंभ झाला आहे. भाविकांच्या उत्साहाने आणि भक्तिरसाने भारावलेल्या वातावरणात मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.विशेष म्हणजे बुधवार, दिनांक 2 एप्रिल रोजी अध्यात्मिक रामायण स्वाहाकार यागास वेद घोषाच्या मंगलमय वातावरणात ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजा सुरू होणार आहे. या धार्मिक विधीमुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
श्रीराम नवमी व चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या माळांनी, आंब्याच्या पानांच्या तोरणांनी व केळीच्या खांबांनी सजवण्यात आला आहे. तसेच, भव्य विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला असून, भक्तगणांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती मिळत आहे. चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कीर्तन, प्रवचन आणि हरीपाठाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंद व समाज प्रबोधनाचा लाभ मिळणार आहे.
काकड आरती: सकाळी 6 ते 6:45
भजन: सकाळी 7:15 ते 9:15
प्रवचन: दुपारी 2 ते 5
हरिपाठ: सायंकाळी 5:15 ते 6
कीर्तन: रात्री 8 ते 10 (राज्यभरातील प्रसिद्ध कीर्तनकारांच्या उपस्थितीत)
चैत्र शुद्ध नवमी, रविवार 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती होईल. त्यानंतर 10 ते 12 दरम्यान हरिभक्त परायण श्रीराम आणि ठाकूर लातूर यांचे कीर्तन होईल. दुपारी भव्य रथ, मेणा व पालखी परिक्रमेने उत्सवाची शोभा वाढवली जाणार आहे. श्रीराम नवमी उत्सवाची सांगता 7 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 7 हरिभक्त परायण प्रमोद बुवा राहणे (पळशी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर दहीहंडी आणि गोपालकाल्याने या भक्तिमय उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवानिमित्ताने संपूर्ण संत नगरी भक्तिरसात न्हालेली असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.