सोन्याच्या दराने गाठला सात वर्षातील उच्चांक

gold cube

नवीदिली, वृत्तसंस्था | आखातातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दराने आज (दि.९) एक नवा उच्चांक गाठल्याचे पहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात तब्बल दोन टक्क्यांची वाढ झाली असून ते १,६११ डॉलर्स प्रति औंस पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरानेही उच्चांक गाठला असून ती १८.८० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचली आहे. सोन्याच्या दराने गेल्या सात वर्षातील उच्चांक गाठला आहे.

 

दुसरीकडे देशातही सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असून चेन्नईमध्ये सोन्याच्या दराने (२४ कॅरेट) ४२ हजार ८६० रूपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात ५.५ टक्क्यांची वाढ झाली असून या आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर घरगुती बाजारपेठेत चांदीच्या दरांनी उच्चांक काढला असून ते ४८ हजार ८७५ रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

घरगुती बाजारपेठेत एका दिवसात १० ग्राम सोन्याच्या दरात ४५० रूपयांची तर गेल्या १० दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रूपयांची वाढ झाली आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होत असते. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली घसरणही सोन्याच्या दरवाढीमागील कारण असल्याचे जाणकार सांगतात. चेन्नईमध्ये सोन्याच्या दराने ४२ हजार ८६०, कोलकात्यात ४१ हजार ७८० तर अहमदाबादमध्ये ४१ हजार ६३०, दिल्लीत ४१ हजार २८० आणि मुंबईत ४१ हजार १५० रूपयांचा टप्पा गाठला आहे.

Protected Content