सीतामाई नगरात बंद घरातून सोन्याचे दागिने लांबविले

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सीतामाई नगरातील एकाचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातून ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी चौकशी अंती गुरुवारी १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप प्रकाश पाटील वय-४३, रा. सीतामाई नगर चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजता त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातून ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर संदीप पाटील यांनी गुरुवारी १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय पाटील हे करीत आहे.

Protected Content