जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे डॉक्टर दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील तज्ञांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. निखिल चौधरी, डॉ. उमाकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. पंडित यांनी वैद्यकीय क्षेत्र हे सेवेचे क्षेत्र असून, रुग्णांबद्दल आपलेपणाची भावना असली तर यश निश्चित मिळते, असे सांगितले. डॉ. आर्विकर यांनी वाचन आणि प्रत्यक्ष काम एकमेकांना पूरक असून, यशस्वी डॉक्टर होण्यासाठी या दोन्ही गोष्टी गरजेच्या असल्याचे नमूद केले. प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत सोळंके यांनी डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि साधना गरजेची असल्याचे सांगितले. अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर दिनाचे महत्त्व विषद करून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फिया पिंजारी व विरेंद्र ताडे यांनी केले, तर आभार बाबासाहेब पाटील यांनी मानले. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व तज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.