Home आरोग्य गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

0
129

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आरोग्यसेवेत झपाट्याने होत असलेल्या डिजिटल परिवर्तनाचा वेध घेणारी “तंत्रज्ञान-सक्षम युग: नर्सिंगची डिजिटल पल्स स्वीकारणे” या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद जळगावातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे गुरुवार (१३ नोव्हेंबर) रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचा समारोप शुक्रवार (१४ नोव्हेंबर ) रोजी होणार असून, देश-विदेशातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत डिजिटल आरोग्याचे नवे क्षितिज खुलणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नर्सिंग फॅकल्टीच्या डीन डॉ. श्रीलेखा राजेश यांच्या हस्ते झाले. यावेळी चेन्नई येथील डॉ. एस. जे. नलिनी, सिक्कीमच्या डॉ. श्रीजना प्रधान, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, परिषद अध्यक्ष प्रा. विशाखा गणवीर, उपप्राचार्य जेसिंथ ढया, तसेच प्रा. अश्विनी वैद्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र पार पडले.

या परिषदेत नर्सिंग शिक्षण, सराव, नेतृत्व आणि संशोधन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानामुळे झालेल्या क्रांतीचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), टेलिहेल्थ, डेटा-आधारित पद्धती, तसेच वेअरेबल टेक्नॉलॉजी यांसारख्या आधुनिक संकल्पनांवर नामवंत तज्ज्ञांचे सादरीकरण झाले. दुपारच्या सत्रात वैज्ञानिक पेपर प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले, तर संवाद सत्रातून सहभागींच्या शंका दूर करण्यात आल्या.

शुक्रवारी ‘टेलिहेल्थ स्वीकारण्यातील अडथळ्यांवर मात करणे’, ‘टेलीनर्सिंग आणि एआय संशोधनातील नैतिक आणि कायदेशीर पैलू’, तसेच ‘डिजिटल आरोग्यातील जागतिक सहकार्य’ या विषयांवरील चर्चासत्रांनी परिषदेचा दिवस रंगला. ‘डिजिटल भविष्यासाठी परिचारिकांना सक्षम बनवणे’ या विषयावर आयोजित पॅनल डिस्कशन हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.

फिलिपिन्स, सौदी अरेबिया, चेन्नई, सिक्कीम, कराड आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी या परिषदेत सहभाग नोंदविला आहे. विशेष वक्त्यांमध्ये डॉ. दिप्ती सोर्टे (देहरादून), डॉ. मारिया ब्लेसिल्डा बोंटोल्लागुनो (फिलिपिन्स), डॉ. अबीर एम. अब्देलकादर (सौदी अरेबिया), डॉ. बरखा देवी (सिक्कीम), आणि डॉ. वैशाली मोहिते (कराड, पुणे) यांचा समावेश आहे.

गोदावरी फाउंडेशन्सचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही परिषद यशस्वीपणे पार पडत आहे. आरोग्यसेवेतील डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नर्सिंग क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण आणि नवनवीन कल्पनांचा अविष्कार घडणार असून, ही परिषद जळगावच्या नावे एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे.


Protected Content

Play sound