
मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या हृदयद्रावक घटनेविरोधात मुक्ताईनगर शहरातही तीव्र निषेध नोंदवत विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि सोसायट्यांमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी होत हल्ल्यातील निरपराध बळींना आदरांजली वाहिली.
या उपक्रमात समाजसेवक अतुल अरुण जावरे यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील विविध भागांना भेट देत नागरिकांसह श्रद्धांजली अर्पण केली. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी अंतर्गत जे. ई. स्कूल, संत मुक्ताई वारकरी संस्था जुने कोथळी, मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी, जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि संताजी नगर या ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमांमध्ये उपस्थितांनी एकमुखाने या दहशतवादी कृत्याचा निषेध नोंदवत सरकारने अशा कृत्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली. “सध्या देशात आणि राज्यात निवडणुकीचे वातावरण असताना अशा घटना होणे अत्यंत दुर्दैवी आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या कारवायांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे मत समाजसेवक आणि शिक्षकांनी या प्रसंगी व्यक्त केले.
प्रत्येक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या लावून, हातात राष्ट्रीय ध्वज धरून देशाच्या एकात्मतेचा आणि शांततेचा संदेश दिला. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देत शोकसभा संपन्न केली. समाजातील सर्व घटक एकत्र येऊन देशासाठी ऐक्य आणि सहिष्णुतेचा संदेश देत कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.



