हिंमत असेल तर पाकिस्तानी लोकांना नागरिकत्व देवून दाखवा – मोदींचे काँग्रेसला आव्हान

Narendra Modi Indian elections 2019 Modi Narendra Modi news 938x450

रांची, वृत्तसंस्था | नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘हिंमत असेल तर पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला भारताचे नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असे आव्हान मी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना देतो,’ असे मोदींनी म्हटले आहे. झारखंडच्या बरहेटमधील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

 

नागरिकत्व कायद्याला काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. तर उत्तर भारतासह ईशान्येकडील काही राज्यांत या कायद्याला विरोध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्याला तीव्र विरोध होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेतून काँग्रेससह विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे. ‘तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असे मी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करून दाखवा, तिहेरी तलाकविरोधी जो कायदा केला आहे, तो रद्द करा, असेही मी आव्हान देतो,’ असे मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेस आणि त्यांचे काही सहकारी पक्ष या मुद्यावर मुस्लीमांना चिथावणी आणि भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या नीतीमुळे एकदा फाळणी झाली आहे. भारतमातेचे तुकडे झाले आहेत. अवैधपणे लाखो घुसखोरांना भारतात घुसण्याची संधी देणारा हाच काँग्रेस आहे. देशात त्यांचा वापर नेहमीच व्होटबँकेसाठी केला गेला, असा आरोपही मोदींनी केला. घुसखोरांमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याला काँग्रेससह अनेक वर्षे सत्तेत असलेले सहकारी जबाबदार आहेत. काँग्रेस आणि त्याचे सहकारी पक्ष खोटे पसरवताहेत. नागरिकत्व कायद्याबाबत म्हणाल तर देशातील एकाही नागरिकावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. हा कायदा भारतात येणाऱ्या लोकांसाठी आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Protected Content