आता चक्क अण्णा हजारेंच्याच विरोधात आंदोलन !

नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकेकाळी आपल्या प्रखर आंदोलनांनी देशव्यापी प्रसिध्दी मिळविलेले अण्णा हजारे हे सर्वसामान्यांचे जगणे बेहाल झाले असतांना आंदोलन का करत नाही ? अशी विचारणा करत आता एका सामाजिक कार्यकर्त्याने यावरूनच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अनेक आंदोलन गाजली आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आंदोलन केलेले नाही. यामुळे आता त्यांच्याच विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथेच अण्णा हजारेंविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे. झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना झोपेतून उठवण्यासाठी १ जून रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करतांना सोमनाथ काशिद म्हणाले की, सध्या महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात ‘अण्णा उठो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.

लोकायुक्त मुद्यावर आंदोलन मात्र महागाईवर अण्णांचे मौन?
सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे? असा सवालही त्यांनी केला. अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून जागे करण्याची आवश्यकता आहे. अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज असल्याचेहि सोमनाथ काशिद यांनी म्हटले.

विशेष बाब म्हणजे अलीकडेच अण्णा हजारे यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. तर महागाईसह अन्य मुद्यांवरून त्यांनी मौन बाळगले असल्याचा आरोप करून सोमनाथ काशिद यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याची बाब लक्षणीय आहे

Protected Content