Home Uncategorized आदिवासींना शबरी घरकुलचा लाभ द्या; बनावट जात प्रमाणपत्रांची चौकशी करा, एकलव्य आघाडीचे...

आदिवासींना शबरी घरकुलचा लाभ द्या; बनावट जात प्रमाणपत्रांची चौकशी करा, एकलव्य आघाडीचे उपोषण सुरू


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. शबरी घरकुल योजनेचा लाभ पात्र आदिवासी बांधवांना मिळावा, बनावट जात प्रमाणपत्रांची चौकशी करून ती रद्द करण्यात यावीत तसेच विविध संस्थांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

जिल्ह्यातील तसेच जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द आणि वडनगरी या गावांमधील आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांना अद्याप शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाच्या विविध योजना कागदावरच मर्यादित राहत असून गरजू व पात्र लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळत नसल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.

यासोबतच पाचोरा येथील रोह मच्छीमार सहकारी संस्थेच्या कथित मनमानी कारभाराविरोधातही उपोषणकर्त्यांनी आवाज उठविला आहे. संबंधित संस्थेमध्ये पारदर्शकता नसून काही निर्णय मनमानी पद्धतीने घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने आदिवासी भिल समाजाचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जात प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी एकलव्य आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बनावट जात प्रमाणपत्रांमुळे खऱ्या आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

शिवतीर्थ मैदान येथे सुरू असलेल्या या उपोषणात एकलव्य आघाडीचे जिल्हा महासचिव अमित तडवी आणि जिल्हा निरीक्षक गोरख गायकवाड हे प्रमुख सहभागी झाले आहेत. प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

 


Protected Content

Play sound