तीन तासांच्या आत तपासणी अहवाल मिळावा-जिल्हाधिकारी

जळगाव । कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी एक्स-रे, रक्त व इतर तपासणी अहवाल तीन तासांच्या आत डॉक्टरांना उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. ते कोविड रूग्णालयातील बैठकीत बोलत होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी कोविड रुग्णालयात बैठक घेतली. या प्रसंगी अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक नागोजी चव्हाण, इन्सिडेंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, टास्क फोर्सचे डॉ.सुशील गुजर, राहुल महाजन, लीना पाटील, नीलेश चांडक आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांनी खासगी रुग्णालयातही अँटिजेन टेस्ट करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक फिजिशियनने रिकमंड केलेली अ‍ॅँटिजेन टेस्ट ग्राह्य धरावी. खासगी डॉक्टरांच्याही टेस्ट ग्राह्य धराव्यात, अशा सूचना दिल्या. कोविड रुग्णालयात मृत झालेल्या १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूबाबत टास्क फोर्सकडून डेथ ऑडिट करण्यात येत आहे. इतर आजाराबरोबर वयोवृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. गंभीर परिस्थितीत रुग्ण दाखल झाल्याने मृत्यू होत असल्याचेही समोर आले असून याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उशिराने रुग्ण दाखल केल्याबाबत त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी जाब विचारला. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधून अत्यवस्थ रुग्ण वेळीच पाठवा. विलंब करू नका. रुग्ण वेळेवर दाखल होण्यासाठी आढावा घ्या, अशा सूचनाही दिल्या.

दरम्यान, कोविड रुग्णालयात दाखल रुग्णावर तातडीने उपचाराासाठी रुग्णाची रक्त, लघवी, एक्स-रे व इतर चाचण्यांसाठी वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. केवळ तीन तासांच्या आत डॉक्टरांना या तपासण्यांचे अहवाल देण्याबाबत प्रयोगशाळेच्या कर्मचार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी सूचना दिल्या.

Protected Content