मुलींनी मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे – नीलिमा हिवराळे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महिलांची छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार अशा घटना समाजात सर्रास घडत आहेत. या घटनांचा तरुणांवर मोठा परिणाम होत आहे. यासाठी मुलींनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, असे मत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या सहायक निरीक्षक निलिमा हिवराळे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलतांना त्या म्हटल्या की, घरगुती हिंसाचार या घटनांना जर आळा घालायचा असेल तर वेळीच याला विरोध केला पाहिजे यामुळे पुढचा अनर्थ  टाळता येतो. तसेच महिलांना संकटकाळी  मदत व्हावी म्हणून 112 या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधून तुम्ही मदत मिळवू शकतात असेही त्यांनी सांगितले. मु.जे.महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विभाग व युवती सभेतर्फे “महिला सुरक्षा अभियान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्मार्टफोन यासोबतच इंटरनेटमुळे आपले जीवन सुकर झाले आहे. माहितीची देवाण घेवाण अतिशय सोपी झाली आहे. स्मार्टफोन हे दुधारी शस्त्र असल्याने त्याचा वापर करतांना खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे ही बाब तरुण वर्गाने लक्षात घेतली पाहिजे. कायदा हा आपल्या सुरक्षेसाठीच तयार केला आहे. मात्र त्याचा वापर आणि वेळीच खबरदारी घेणे यालाही तितकेच महत्व आहे. असा मोलाचा  सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी व्यासपीठावर मु जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, प्रा. बी. एन केसुर, प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. लक्ष्मण वाघ आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य स. ना. भारंबे यांनी विद्यार्थी संवादात म्हटले की, समाजात घटणारी कोणतीही विपरीत अथवा वाईट घटना ही मानवी मन सुन्न करते. आजची युवापिढी ही देशाचे उज्वल भविष्य असल्याने त्यांनी परस्पर आणि निकोप संवाद वाढविला पाहिजे यामुळे विसंवाद टाळला जाऊन विपरित घटना आपसूकच बंद होतील  असे त्यांनी म्हटले. सूत्रसंचालन व आभार प्रा. विजय लोहार यांनी केले. यावेळी प्रा. योगेश बोरसे, प्रा. उज्वला नेहते, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके, भारत वाळके आदी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content