जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात धावत्या रेल्वेचा धक्का लागून दिव्या आपसिंग डावर रा. भिकनगाव मध्यप्रदेश या दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपसिंग डावर हे मुळचे भिकनगाव जि. खरगोन मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. मजूरी काम करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. रेल्वेच्या कंत्राटी कामासाठी डावर कुटुंबिय हे जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात वास्तव्याला आहे.
गुरूवारी, १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास डावर कुटूंबिय खेडी शिवारातील रेल्वे रूळाजवळ खडी टाकायचे काम करत होते. त्यांची दोन वर्षीय मुलगी दिव्या ही अचानक खेळता-खेळता रेल्वे रूळावर आली. खेळत असतांना बालिकेला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला लागलीच रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, वैदयकीय अधिकारी यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.