ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी

एरंडोल प्रतिनिधी | धरणगाव रस्त्यावर एरंडोलकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली त्यात दुचाकीवरील एक इसम जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एरंडोल पासून एक किलोमीटर अंतरावर घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोलकडून धरणगावकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक आर जे ११ जे ९३३५ ) धरणगावकडून येत असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील भोला (वय २२ वर्ष रा.नागपूर) हा युवक जागेवरच गतप्राण झाला तर त्याचे साथीदार अजय कुमार चव्हाण (वय २० वर्ष), लोकेश सोळंकी (वय ३० वर्ष), राम जीवन चव्हाण (वय ४२ वर्ष) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. डॉक्टर कैलास पाटील यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. नंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.

दरम्यान ही दुर्घटना झाल्यानंतर ट्रक धरणगावकडे सुसाट वेगाने नेण्यात आला. मात्र रेल्वे पूलावर पोलिसांनी ट्रक चालकाला ट्रकसह पकडले . ट्रक एरंडोल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. एम पी१२ एच डब्ल्यू ८८२९ क्रमांकाची डिलक्स दुचाकी मध्य प्रदेशाची असून ती एरंडोल कडे येत होती. या दुचाकीने मृत व्यक्तीसह त्याचे जखमी झालेले तिघं साथीदार प्रवास करीत होते . या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content