गिरीश महाजन यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा ; 31 लाखांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील अतिवृष्टी, महापुरामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील शेती व मालमत्तेच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी सरकारने आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक लोकप्रतिनिधी, संस्था आणि नागरिकांनी या निधीसाठी योगदान दिले असले तरी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्षभराचे संपूर्ण मंत्रीपदाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.

गिरीश महाजन यांनी डिसेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीतील एकूण रु. 31,18,286 इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्पण केली. ही रक्कम त्यांनी आजच मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश व संमतीपत्रासह सुपूर्त केली. या निर्णयामुळे महाजन राज्यातील असे पहिले मंत्री ठरले आहेत, ज्यांनी आपला संपूर्ण वर्षभराचा पगार जनतेसाठी दिला आहे.

राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या महापुराने अनेक जिल्ह्यांतील शेतकरी आणि सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक या भागांना गिरीश महाजन यांनी वैयक्तिक भेटी देऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या व मदतीचे आश्वासन दिले.

महाजन यांनी संकटाच्या काळात केवळ प्रशासनाच्या भूमिकेत राहून मदत केली नाही, तर वैयक्तिकरीत्या आर्थिक योगदान देऊन सामाजिक भान जपले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर, दुष्काळ, आगीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना थेट मदत मिळते. या निधीत अनेक सेवाभावी संस्था आणि खासगी व्यक्तींनी मदतीचा हात दिला आहे. परंतु मंत्र्यांनी संपूर्ण वर्षभराचा पगार देणं ही गोष्ट समाजात एक सकारात्मक संदेश देणारी ठरते.

“राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेवर मोठे संकट कोसळले आहे. सरकार त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. माझ्या कडूनही काही योगदान व्हावं, यासाठी मी वर्षभराचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत अर्पण करत आहे,” असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.