गिरीश महाजनांचे डोके फिरलेयं : संजय राऊतांचे टिकास्त्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर येथील भयंकर घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना आता खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. काल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना बदलापूरसह रेल्वे वाहतूक देखील रोखून धरली. तर, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. यात शिवसेना-उबाठा पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात खासदार राऊत म्हणाले की, गिरीश महाजन आता असे देखील म्हणतील की, ज्यांच्यावर अत्याचार झाल्या त्या चिमुकल्या मुली विरोधकांच्या असतील, त्यांना मॅनेज केले असेल. गिरीश महाजनांचे डोके फिरले असून अशा विषयात राजकारण करू नका. पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते, त्यांच्यावर दबाव येत होता. यावर तुम्ही का बोलत नाहीत ? असे संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना सुनावले आहे.

तसेच, ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा भाजपशी संबंधीत लोकांची असल्याने भाजप गप्प असल्याचा आरोप देखील राउत यांनी केला. ते म्हणाले की, दुसऱ्यांची शाळा असती तर फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ आतापर्यंत शाळेच्या पायऱ्यांवर जाऊन ओरडत बसले असते. तर, आता भाजपचे बुलढोजर कुठे गेले ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Protected Content