नाथाभाऊ, ही प्रतिक्रिया तुमच्या सडक्या मनोवृत्तीची प्रचिती देणारी होय ! : आ. महाजन

जळगाव (प्रतिनिधी ) : ”एकनाथराव खडसे यांनी कोरोनावरून आज दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्‍वर सदबुध्दी देवोत” अशा शब्दांमध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आ. गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. याला सध्या हॉम क्वॉरंटाईन होऊन कोरोनावर उपचार घेत असलेल्या गिरीशभाऊंनी जोरदार पलटवार करत उत्तर दिले आहे.

माध्यमांशी बोलताना आज गिरीश महाजन म्हणाले, मला कोरोना झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काल खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी आज विकृतीचा कळस गाठून अतिशय खालच्या स्तरावरून कॉमेंट केली आहे. खरं तर नाथाभाऊ यांचा स्वभाव आणि आजवरचा लौकीक पाहता ही प्रतिक्रिया तशी आश्‍चर्यकारक नाही. मात्र ही प्रतिक्रिया त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचे सिध्द करणारी ठरली आहे. मला या संदर्भामध्ये काहीही बोलायचं नाही. आता कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची त्यांना हौस आलेली आहे. मात्र हे त्यांचे फ्रस्टेशन आहे. सत्तेचा कोणता तरी तुकडा भेटेल म्हणून पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यांच्याकडे कुठलेही पद नसल्याकारणाने ते सध्या रिकामे आहे त्यामुळे त्यांना असे उपद्व्याप सुचत आहे त्यांची ही भाषा निश्चितच शोभनीय नाही कुठलेही त्यांच्याकडे काम नसल्याकारणाने आता फक्त फुशारका मारण्याच्या पलीकडे ते काहीही करू शकले नाही. आम्ही हे केलं आम्ही ते केलं अशा फुशारका मारण्याशिवाय ते काही करणार नाही. या नैराश्यातूनच त्यांना आता हे विधान केले आहे. मात्र ते कितीही विकृत पातळीवर उतरले तरी आम्ही आमचे संस्कार सोडणार नाहीत. .गेट वेल सून….या विकृतीतून लवकर बाहेर यावे यासाठी आपल्याला शुभेच्छा….अशा शब्दांमध्ये आ. गिरीश महाजन यांनी शालजोडीतले मारून एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!