सर्व विरोधक एकत्र आल्यानेच रोहिणी खडसेंचा पराभव- गिरीश महाजनांचा दावा ( व्हिडीओ )

girish mahajan

जळगाव प्रतिनिधी । तिन्ही विरोधी पक्ष एकत्र आल्याने मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला असून यात पक्षातील कुणाचा हात नसल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन आज पत्रकार परिषदेत म्हणाले. एकनाथराव खडसे हेदेखील गेल्या वेळेस कमी मतांनी निवडून आले होते. तसेच त्या मतदारसंघात नेहमीच चुरस असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गत काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. यासोबत रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवात स्वकीयांचा हात असल्याचेही त्यांनी उघडपणे सांगितले आहे. या पार्श्‍वभूमिवर, माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खोडून काढले. ते म्हणाले की, भाजपमध्येच ओबीसींचा खर्‍या अर्थाने सन्मान करण्यात आला आहे. आधीच्या सरकारमध्ये ओबीसी समाजाचे सर्वाधीक मंत्री होते. तर भाजतर्फे आता निवडून आलेल्या ओबीसी आमदारांची संख्यादेखील लक्षणीय आहे. यामुळे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे ते म्हणाले. तसेच मुक्ताईनगरचा विचार करता येथे आधीपासूनच निवडणुकीत प्रचंड चुरस असते. खुद्द एकनाथराव खडसे हे गेल्या वेळेस मोदी लाट असतांनाही कमी मतांनी निवडून आले होते. यात आता ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात नव्हते. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही विरोधक एकत्र आल्याने त्यांचा पराभव झाला असून यात कुणाचा हात असल्याचा त्यांनी साफ इन्कार केला. दरम्यान, या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यमान सरकारच्या निर्णयांवर जोरदार टीकादेखील केली.

या पत्रकार परिषदेला आमदार राजूमामा भोळे व आमदार चंदूलाल पटेल यांची उपस्थिती होती.

पहा : पत्रकार परिषदेत गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/794350531016232

Protected Content