दिव्यांग मंडळाचे कामकाज पारदर्शक, नियोजनबद्ध : डॉ. जयप्रकाश रामानंद

वैद्यकीय तपासणी आता दिव्यांग मंडळातच; अधिष्ठात्यांचे हस्ते झाली सुरुवात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळाचे कामकाज पारदर्शक व नियोजनबद्ध झाले असून आदर्श कुपन प्रणालीमुळे दिव्यांग मंडळात होणारे दिव्यांग बांधवांचे हाल आता थांबले आहे.” असे सांगत दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा हा राज्यातील अभिनव प्रयोग कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळातर्फे दिव्यांग बांधवाना प्रमाणपत्र मिळण्यासाठी कार्यवाहीचा भाग म्हणून दिव्यांगांची दर बुधवारी वैद्यकीय तपासणी केली जात असते. यातील अस्थिरोग व फिजिशियन तपासणी पूर्वी तात्पुरती व्यवस्था म्हणून विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयात केली जात होती. हि तपासणी दिव्यांग मंडळातच व्हावी, यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश  रामानंद आणि दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे आग्रही होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिव्यांग मंडळाचे व्यवस्थित बांधकाम व नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे नवीन रूपात आता दिव्यांग मंडळ तयार झालेले आहे. 

बुधवारी, २७ एप्रिल रोजी मंडळातील दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणी कक्षाची सुरुवात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. यावेळी दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधिक्षक  डॉ. विजय गायकवाड, अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, कान नाक घसा प्रभारी विभागप्रमुख डॉ. विनोद पवार, डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष हरीश कुमावत, दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी दिव्यांग बांधवांच्या कागदपत्रांची व त्यानंतर शारीरिक तपासणीची मंडळाच्या पॅनलवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज घोगरे, डॉ. नेहा चौधरी यांनी सुरुवात केली. दिव्यांग मंडळाचे बदललेले रुपडे पाहून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी कर्मचारी वर्गाचे कौतुक केले. दिव्यांग मंडळात दिव्यांग बांधवाना सर्व प्रकारे सहकार्य मिळेल या दृष्टीनं कर्मचारी वर्ग तत्पर आहे. याठिकाणी दिव्यांग व त्यांच्या नातेवाईकांना कर्मचारी चेतन निकम, विशाल दळवी, दत्तात्रय पवार, आरती दुसाने यांनी माहिती दिली. दिव्यांगांना तपासणीच्या नियोजनासाठी जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, कंत्राटी कर्मचारी निरीक्षक अजय जाधव, सुरक्षा निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले. 

दिव्यांग मंडळाच्या अध्यक्षांचे आवाहन –

दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही अत्यंत पारदर्शकपणे पार पडत आहे. त्यांना ऑनलाईन भरलेला फॉर्म दाखवून कुपन दिले जाते. कूपनवरील तारखेला वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही सुरू होते. हि प्रक्रिया पारदर्शक आहे. तरीही काही खाजगी व्यक्ती दिव्यांग बांधवांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. जिल्हाभरातील दिव्यांग बांधव याबाबतचे दुःख मंडळात मांडतात. त्यामुळे, कोणत्याही दिव्यांग बांधवाने कुठल्याही अनधिकृत इसमाशी आर्थिक व्यवहार करू नये, त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. प्रमाणपत्र मिळण्याबाबत काही शंका असतील तर त्या मंडळात सांगाव्यात, त्याचे निरसन केले जाईल असे आवाहन दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!