भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जय श्रीराम चौकातील डेअरीजवळ हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरविणाऱ्या संशयित आरोपी मनीष उर्फ मिठ्या रवींद्र ठाकूर वय-२२ रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील जय श्रीराम चौकात असलेल्या सदानंद डेअरी जवळ संशयित आरोपी मनीष उर्फ मिठ्या ठाकूर हा हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकामधील पोलीस उपनिरीक्षक गणेश चोबे, पोहेकॉ महेश महाजन, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रणजीत जाधव, मोतीलाल चौधरी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने कारवाई करत संशयित आरोपी मनीष उर्फ मिठ्या रवींद्र ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. त्याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.