हिरेन हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला सचिन वाझे होते ; एन आय ए चा कोर्टात दावा

 

मुंबई : वृत्तसंस्था । एनआयएने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित होते, असा दावा एनआयएने केला आहे.

 

अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांची गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या या दोन्ही प्रकरणांचा सध्या एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक केलेली असून, त्यांची चौकशी केली जात आहे.

 

मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयात माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट एका बैठकीत रचण्यात आला. त्या बैठकीला सचिन वाझेही उपस्थित होते. त्याचबरोबर विनायक शिंदेही त्या बैठकीत सहभागी झालेला होता. हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीशी संपर्क करण्यासाठी सचिन वाझेंनी मोबाईलचा वापरही केला होता. यावेळी एनआयएने कट रचणाऱ्या आरोपीचं नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, तपास यंत्रणा हत्येमागील कटाचा आणि त्याच्या उद्देशाच्या खूप जवळ पोहचली असल्याचं एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. एनआयएच्या युक्तीवादानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर. सीत्रे यांनी आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या एनआयए कोठडीचा कालावधी ७ एप्रिलपर्यंत वाढवून दिला.

 

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता? या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचं एनआयएने न्यायालयात सांगितलं. यावेळी आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं शिंदेचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयात सांगितलं. सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवलं गेलेलं नाही, असं जैन म्हणाले. शिदे नऊ दिवसांपासून तपास यंत्रणांच्या कोठडीत असून, आणखी कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तीवादही जैन यांनी केला. दुसरीकडे नरेश गोर यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड पुरवण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनी न्यायालयात सांगितलं. न्यायालयाने सुनावणी अंती दोघांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.

Protected Content