नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या

गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना गुरूवारी २३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली.  लालसू वेलदा (वय-६३, रा. टिटोळा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे.

हेडरी पोलीस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात हा थरार घडला. गाव पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासमोरच हा थरार घडला. दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यात सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

Protected Content