पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर संशयास्पद वाहनाची तपासणी करताना महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मारुती ईको वाहनांचे सायलेंसर व कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. महामार्ग पोलीस केंद्र पाळधी आणि पारोळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच ५ ते ६ किलो सायलेंसर माती असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथील मोबाईल पथक आणि पारोळा पोलीस स्टेशनचे पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर संयुक्त नाकाबंदी करीत होते. यावेळी म्हसवे गावाच्या पुढे DL3CBU3358 क्रमांकाचे वॅगनार वाहन पोलिसांना संशयास्पद अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवून त्याची चौकशी केली. वाहनामध्ये तीन इसम आढळून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्यापैकी एक इसम घटनास्थळावरून पसार झाला. उर्वरित दोघांकडे वाहनाची कागदपत्रे तसेच इतर आवश्यक माहितीबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. यानंतर पोलिसांनी वॅगनार वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये टॉमी, हातोडा आणि गुन्ह्यासाठी वापरता येणारे इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. त्याचबरोबर मारुती ईको वाहनांचे तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टरही पोलिसांच्या हाती लागले. या साहित्यामुळे संबंधित संशयितांचा चोरीच्या घटनांशी संबंध असल्याचा संशय अधिक दृढ झाला.

या कारवाईत आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगढ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि अंदाजे ५ ते ६ किलो सायलेंसर माती असा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेले वाहन आणि दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारोळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेल्या तिसऱ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच या टोळीचा अन्य ठिकाणी झालेल्या सायलेंसर किंवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई महामार्ग पोलीस केंद्र पाळधी आणि पारोळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली. कारवाईमध्ये पोलीस हवालदार हितेश पाटील, राजेंद्र ठाकूर, अनिल सपकाळे, विजय दुसाने, सुशील पाटील, शरद पाटील तसेच चालक पोलीस नाईक संदीप पाटील यांचा सहभाग होता. राष्ट्रीय महामार्गावरील नाकाबंदी आणि वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संशयास्पद वाहनातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. या कारवाईमुळे महामार्गावरील वाहन चोरी तसेच सायलेंसर-कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची दक्षता महत्त्वाची ठरत असल्याचे दिसून आले आहे.



