विद्यापीठात ‘गांधी नाकारायचाय’ या नाटकाचे अभिवाचन

abhivachan 1

जळगाव प्रतिनिधी । डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनांतर्गत अभिवाचन महोत्सवाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात करण्यात आले होते. या महोत्सवाच्या आज तिसऱ्या व शेवटच्या दिवशी शंभु पाटील लिखित ‘गांधी नाकारायचाय’ या नाट्याचे अभिवाचन करण्यात आले.

महात्मा गांधींना कितीही नाकारायचे ठरविले तरी कोणालाच नाकारता येणे शक्य नाही, मात्र गांधी स्विकारणे देखील तितकेच कठिण असल्याचा आशय सांगणाऱ्या नाट्य अभिवाचनाने आज प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवत गांधीमय केले. परिवर्तन ग्रुपच्या कलावंतानी हे अभिवाचन केले.

महात्मा गांधी हा फार सहज तर कधी निंदेचा विषय समजला जातो. त्या पार्श्वभूमीवर या नाट्यात गांधींना समाज न्यायालयाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन त्यांच्यावर खटला उभा केला जातो. यात अनेक वृत्ती-प्रवृत्ती, त्यांनी केलेली गांधींची मिमांसा, टिका असा सुरु झालेला हा प्रवास गांधींचे आजच्या काळातही असलेले महत्व अधोरेखित करत संपतो. अनेक गंमती जंमती, चिमटे काढत प्रेक्षकांना या अभिवाचनाने अंतर्मुख केले. गांधी समजून घेण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी वाचायला हवे. असे सांगत कलावंतांनी नाट्यानुभव दिला.

विकास जैन यांनी महात्मा गांधीची भूमिका साकारली. या अभिवाचनात नारायण बाविस्कर, होसिलसिंग राजपूत, मंजूषा भिडे, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील हे कलावंत सहभागी झाले होते. प्रकाश योजना व निर्मिती प्रमुख राहूल निंबाळकर होते. या कार्यक्रमास जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोक जैन, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, अनिस शाह उपस्थित होते. नाट्य अभिवाचनापूर्वी वैशाली शर्मा यांनी प्रास्ताविक केले.

Protected Content