गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदयात्रेस आरंभ

चोपडा प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगावच्यावतीने महात्मा गांधींजीच्या ७० व्या पुण्यतिथी निमित्त बा-बापू१५० कार्यक्रमांतर्गत पदयात्रेची सुरुवात चोपडा शहरातून महात्मा गांधीजींचे चौकातून झाली.

पदयात्रेच्या वेळी अमेरिकेतील ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ मार्क लींडले, वनसंरक्षक अधिकारी मोराणकर, चोपडा येथील मान्यवर नागरीक, पोलीस अधिकारी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी व पदयात्रेत सहभागी पदयात्री.

अमेरिकेतील ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ मार्क लींडले, जिल्ह्याचे वनसंरक्षक अधिकारी मोराणकर यांच्या हस्ते पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी शहरातील पोलीस दलातील अधिकारी वर्गही उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात ही पदयात्रा ६ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल. यामध्ये ग्रामविकासाच्या निर्धारासह राष्ट्रीय एकात्मतेचा जागर केला जाणार आहे. तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात वयाच्या ८८ व्या वर्षी मार्क लिंडले यात्रेत पहिल्या पाडावा पर्यंत जोमाने सहभागी झाले हे विशेष.

बा-बापू १५० जयंती वर्षाच्या औचित्याने संपूर्ण स्वच्छता, ग्रामीण आरोग्य, मूल्यशिक्षण संवर्धन, जलव्यवस्थापन, शेतीपूरक उद्योग यावर प्रबोधन होणार आहे. यासाठी गावोगावी मोहल्ला मिटींग, ग्रामपंचायत सदस्य, महिला व पुरूष बचत गट संपर्क, मोतीबिंदू तपासणी शिबीरे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण, श्रमदान, साफसफाई यासाठी लोकसहभाग आदी विषयांवर कामांचे नियोजन देखील होत आहे.

पदयात्रा सुरू झाल्यापासून चोपड्यापासून जवळच असलेल्या नागलवाडी सरपंचा मीराबाई मधुकर पाटील व ग्रामस्थांनी पदयात्रेचे स्वागत केले. उद्याचे आधारस्तंभ असलेली युवापिढीला कृषी आणि पाणीबचतीबाबत जागरूक होणे गरजेचे आहे असे नागलवाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद राजपूत यांनी यावेळी मत व्यक्त केले. या पदयात्रेत भगिनी निवेदिता मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्राचार्य सौंदाणकर सर तसेच प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी हेही उपस्थित होते.

नागलवाडी येथून वराड गावात पदयात्रा पोहोचली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला. गावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी राजेंद्र चौधरी सहभागी झाले. वराड गावचा निरोप घेत पदयात्रा पुढे बोरजअंटी मार्गस्थ झाली. बोरअजंटी येथे पदयात्रेचा मुक्काम असून या मुक्कामात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत व्यसनाधीनता आणि दुष्परिणाम यावर मार्गदर्शन होणार आहे. त्या सोबतच कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने मोतीबिंदू शिबिर देखील होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास परिसरातील खेड्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

Add Comment

Protected Content