गडचिरोली । आज पहाटे पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक होऊन यात १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० या पथकाला आज मोठे यश लाभले आहे. आज पहाटे जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणार्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बेठक सुरू होती अशी माहिती आहे. खबर्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान आज सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
दरम्यान, पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अनेक नक्षलवाद्यांनी पळ काढला असून त्यांची परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.