शहरातील २५ खुले भुखंड सुशोभिकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच कामाला होणार सुरूवात   — आमदार किशोर पाटील

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या विविध कॉलनी भागातील असलेले खुले भुखंड (ओपन स्पेस) याचे सुशोभिकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील काम हाती घेतले आहे. शहरातील २५ खुले भुखंडासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून महिन्याभरात कामांना सुरूवात होणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

आज शनिवार, दि. ३० एप्रिल रोजी ‘शिवालय’ या संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पञकार परिषदेला आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दिकर, मा. नगरसेवक डॉ. भरत पाटील, राम केसवानी, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, वाल्मिक पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजू पाटील व प्रविण ब्राम्हणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, “मतदार संघाचा सर्वांगिण विकास साधतांना पाचोरा शहरातील विविध कॉलनी भागातील ओपन स्पेस यांचे सर्व सोईयुक्त सुशोकरण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून हाती घेतले आहे. शहराचा विस्तार पाहता शहरात सुमारे १०० ते ११० खुले भुखंड असुन यातील ५० ओपन स्पेसचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात शहरातील २५ ओपन स्पेसला शासनाकडून ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असून महिन्याभरात या कामांना गती मिळणार आहे.

या २५ भुखंडांमध्ये विष्णु नगर, भास्कर नगर, कालिका नगर, गाडगेबाबा नगर, शांतीनगर आदर्श नगर, जिजामाता कॉलनी, दुर्गा नगर, कृष्णापुरी, स्वामी समर्थ नगर, रामदास ठाकरे नगर, नारायण नगर, अब्दुल हमिद नगर, आनंद नगर, चिंतामणी काॅलनी, पवन नगर, साई पार्क, वृंदावन काॅलनी, बळिराम नगर, ओ. ना. वाघ नगर, सदगुरू नगर, मल्हार नगर, स्वामी समर्थ नगर, दामजी नगर व मयुर पार्क या २५ ओपन स्पेसला प्रत्येकी २० लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.

या विकासाला गती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार व नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. शहरातील उर्वरित सर्वच ओपन स्पेस पुढिल आठ दिवसात मंजुर करून आणुन शहरातील १०० टक्के खुल्या भुखंडाचा सुशोभित विकास साधला जाणार आहे.

उत्तर महाराष्टात पाचोरा हे पहिले शहर असेल ज्या शहरातील सर्व ओपन स्पेस सुशोभिकरण झालेले असेल. या सुशोभित खुल्या भुखंडाचा झालेला विकास टिकवून ठेवण्यासाठी व ते वृध्दिंगत करण्यासाठी त्या त्या परिसरातील नागरीकांनी व तरूणांनी पुढाकार घेउन त्याची निगा राखत काळजी घेण्याची जबाबदारी घेतल्यास सुंदर शहराचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!