जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय टोकाचा विरोध सुरू असतांना किरीट सोमय्या आणि एकनाथराव खडसे हे चक्क जगासमोर ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे म्हणतील यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. तथापि, हे घडलेय आणि ते देखील एका कार्यक्रमात. यामुळे अर्थातच, राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले गेले आहे.
राजकारण आणि वैयक्तीक संबंध या दोन स्वतंत्र बाबी असतात. याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राजकीय दुश्मनी आणि वैयक्तीक मैत्री ही अनेकांना आश्चर्यकारक वाटत असे. याचे उदाहरण आज देखील दिले जाते. याच प्रमाणे अनेक राजकारण्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतचे आपले संबंध कायम जोपासले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता राज्यात सध्या अतिशय टोकाचे राजकीय वातावरण आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एकामागून एक असे आरोप करून त्यांना त्रस्त केले आहेत. तर सोमय्या यांच्यावरही राज्यातील सत्ताधारी घणाघाती टीका करत आहेत.
या पार्श्वभूमिवर, ‘झी मराठी’ या वाहिनीच्या ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे एकमेकांच्या मैत्रीची अभेद्यता व्यक्त करतांना दिसून आल्याने राजकीय वर्तुळ थक्क झाले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम १३ एप्रिल रोजी रात्री प्रसारीत होणार असला तरी याच्या टिझरमध्ये या दोन्ही नेत्यांनी मिळून शोले चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे म्हटल्याचे दिसून आले आहे. याबाबत नाथाभाऊ म्हणाले की, किरीटजींच्या सोबत आमची सुमारे ३५ वर्षांपासूनची मैत्री आहे. मध्यंतरी दीड वर्षाचा काळ सोडला तर आमच्या नियमीत भेटीगाठी होत असतात. तर सोमय्या यांनी आज नाथाभाऊंचा पक्ष असला तरी भाजपसाठी त्यांनी केलेले काम कुणी विसरणार नसल्याचे नमूद केले.
दरम्यान, याच टिझरमध्ये नाथाभाऊंना देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांचे फोटो दाखवून त्यांना या दोघांवरून कोणती गाणी आठवतात ? असा प्रश्न विचारला. यावर फडणवीसांबाबत खडसे यांनी तात्काळ ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’. . .तर राऊत यांच्या बाबत ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’ हे गाणे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाल्याचे दिसून आले. तर सोमय्या यांनी मात्र या दोन्ही नेत्यांच्या फोटोंना पाहून कोणतेही गाणे न म्हणता किचनवर साफसफाई सुरू केल्याचे पाहून देखील उपस्थितांना हसू आवरेनासे झाल्याचे दिसून आले.
( खालील व्हिडीओत पहा एकनाथराव खडसे आणि किरीट सोमय्यांची किचन कल्लाकारच्या टिझरमधील धमाल मस्ती : व्हिडीओ सौजन्य – ‘झी मराठी’ )