नवी दिल्ली प्रतिनिधी । उत्तर भारतात थंडीचा कहर पहायला मिळतोय. दिल्लीसह इतर अन्य ठिकाणी तापमान शुन्यासह तीन डिग्रीपर्यंत गेल्याचे पहायला मिळाले. हवामान खात्याने रविवारी ८ राज्यांमध्ये रेडअलर्ट घोषित केले असून उत्तप्रदेशात थंडीमुळे ६८ लोकांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर भारतातील अनेक शहरात आज सोमवारी सकाळी थंडीची हुडहुडी कायम आहे.
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशात जबरदस्त थंडीची लाट आली आहे. या थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १ ते ३ जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत लागोपाठ १६ व्या दिवशी थंडीचा कहर अद्यापही सुरूच आहे. गेल्या दशकभरापासून पहिल्यांदा प्रचंड थंडी अनुभवताना दिसत आहेत. दिल्लीने ११८ वर्षापूर्वीचा थंडीचा विक्रम मोडीत काढला आहे. १९०१ साली डिसेंबर महिन्यात अशीच थंडी उत्तर भारतात पडली होती. गेल्या आठवड्यापासून उत्तर भाारतात थंडीने कहर केला आहे. रविवारचा दिवस हवामान बदलामुळे थंडी थोडी कमी झाली होती. लोदी रोडवर तापमान २.८, पालममध्ये ३.२, सफदरजंगमध्ये ३.६ तर आया नगरमध्ये २.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पालममध्ये धुके पसरल्याने विमान उड्डाणाला फटका बसला. तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांनाही फटका बसल्याने अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.