जन औषधी मेडिकल स्टोअर्सतर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा

जन औषधी मेडिकल स्टोअर्सतर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा

पाचोरा, प्रतिनिधी । येथील जनरिक मेडिकल स्टोअर्सचे संचालक यज्ञेश कासार व विशाल कासार या दोघा बंधूंनी आपली सामाजिक व व्यवसायिक बांधिलकी जोपासत पाचोरा शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी “ना- नफा – ना तोटा”  या तत्वावर मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. 

पाचोरा सेंट्रल मॉल समोरील नवकार प्लाझामध्ये कासार बंधूंचे जनरिक  मेडिकल (जनऔषधी) स्टोअर्स आहे. या जन औषधी मेडिकल स्टोअर्स च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा अभिनव विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  मेडिकल क्षेत्रातील रुग्णांशी असलेली बांधिलकी, सामाजिक ऋण व दातृत्व भावना जोपासत आधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे.  अहोरात्र २४ तास ही रुग्णवाहिका उपलब्ध असेल. पाचोरा येथील कोणताही गरजू रुग्ण फक्त रुग्णवाहिकेचा इंधन (डिझेल) खर्च देऊन ही या रुग्णवाहिकेची सेवा घेवु शकतो. गरजूंनी  ९६६५५३८४८४  व  ९०२८९२७८८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे यज्ञेश कासार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.  या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटर व बाय काप मशीनची सुविधा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची आधुनिक सेवा सुविधायुक्त  मोफत रुग्णवाहिका पुरवण्याचा समाजोपयोगी उपक्रम कासार बंधूंनी सुरू केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात व समाजाच्या सर्व स्तरातून जन औषधी मेडिकल स्टोअर्सचे संचालक यज्ञेश कासार व विशाल कासार यांचे कौतुक होत आहे. कासार बंधूंच्या या अभिनव उपक्रमामुळे रुग्णांची खूप मोठी सोय झालेली असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.