विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचं दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे असं धनंजय शिंदे यांनी सांगितले.

धनंजय शिंदे यांनी केलेल्या आरोपात असं म्हटलंय की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस ‘मजूर’ असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणाताही ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ न देता आम्ही आपणास थेट हे अहवालच देण्यास तयार आहोत असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर यांची ज्या ‘प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे’त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे ‘रंगारी’ मजूर असल्याचे दिसते.  सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली व किती मजुरी यासाठी त्याना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा अशी आम आदमी पार्टीची मागणी केली आहे.

 

Protected Content