जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरगुती कारणावरून वाद होऊन शाहरुख खान गुलजार खान (वय ३१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांना सहा जणांनी मारहाण करीत घरातून ७० हजार रुपये काढून नेले. ही घटना कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे शाहरुख खान गुलजार खान हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घरगुती कारणावरून वाद झाल्याने ६ जणांनी शाहरुख खान गुलजार खान यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह आई-वडिलांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर कपाटाच्या लॉकरमधून बळजबरीने ७० हजार रुपये काढून नेले. याप्रकरणी शाहरुख खान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.