तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी धडक तपासणी मोहिम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

 

avinash dhakne 201812176602

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळा, महाविद्यालये व रेल्वे स्टेशन परिसरातील पानटपऱ्यांची तपासणी करण्यासाठी धडक मोहिम राबवावी. जेथे अवैधरित्या गुटखा, तंबाखू विक्री होत असेल त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती दिलीप पाटील, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बबीता कमलापूरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, डॉ. किरण पाटील, डॉ. भारती, डॉ. रावलाणी यांचेसह विविध शासकीय विभागांचे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात अंमलबजावणी अधिकाऱ्याची नेमणूक करावी. त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत पातळीवर शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवावा. गर्दीच्या ठिकाणी तंबाखूच्या दुष्यपरिणामाबद्दल जनजागृती होण्यासाठी प्रचार व प्रसार करावा. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. शिक्षण विभागाने शाळांची तपासणी करतांना तंबाखूमुक्त शाळेचे निकष तपासावे.कोटपा कायदा 2003 अंतर्गत कारवाई करुन तंबाखू नियंत्रण करावे. तंबाखूचे व्यसन सोडणाऱ्यांचे समुपदेशन करावे. व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना मार्गदर्शन करुन त्यांना तंबाखू सोडण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला केले. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाने चायनिज गाड्यांवरील अन्न पदार्थांची तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्यात.

 

1005 व्यक्तींचे समुपदेशन, 43 व्यक्तींनी तंबाखू सेवन सोडले

 

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, कुटीर रुग्णालय व जेथे दंतशल्य चिकित्सक उपलब्ध आहे. तेथे दंतशल्य चिकित्सक यांचेमार्फत तंबाखू मुक्ती करीता समुपदेशन केले जात असल्याची माहिती डॉ. भारती यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात 7 तंबाखू मुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली असून यामधून आतापर्यंत 1005 व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आहे तर त्यापैकी 43 व्यक्तींनी तंबाखूचे सेवन सोडले असल्याची माहितीही डॉ भारती यांनी दिली. तर अन्न व औषध प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसुल केल्याची माहिती सहायक आयुक्त श्री. बेंडकुळे यांनी बैठकीत दिली.

Add Comment

Protected Content