शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिका परवानगीसाठी ; नितिन सोनार यांचा पाठपुरावा सुरु


यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल ते जळगाव या अवघ्या २६ किलोमीटरच्या अंतरावर असलेला शेळगाव बॅरेजचा पूल सध्या पावसाळ्यातील दैनंदिन समस्यांमुळे बंद होता. यामुळे गंभीर रुग्णांना जळगाव येथे वेळेवर पोहोचवणे अशक्य होत होते. अनेक रुग्णांचा जीव उपचाराच्या विलंबामुळे जात असल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) रावेर लोकसभा विभागाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांनी रुग्णवाहिकेला पुलावरून मार्गद्वारे परवानगी मिळावी यासाठी केलेल्या पाठपुरावा सुरु आहे.

नितिन सोनार यांनी तापी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या विनंतीनंतर यावल शेळगाव-जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यावल शहर आणि परिसरातील गंभीर रुग्ण यापुढे सुमारे ५० किलोमीटरचा वळसा घेत न राहता थेट ३० मिनिटांत जळगाव येथील शासकीय रुग्णालय किंवा इतर तातडीच्या सेवा घेण्यासाठी पोहोचू शकतील.

गेल्या काही वर्षांपासून या पुलाचा वापर नागरिकांसाठी बंद होता, विशेषतः पावसाळ्यात. पुलाच्या दुरुस्तीसाठी काम सुरू असल्याने फक्त बांधकामासाठी मर्यादित वापरच परवानगीच्या आधीन होता. मात्र, यावल तालुक्यात वारंवार होणारे अपघात आणि इतर वैद्यकीय आणीबाणीमुळे रूग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत होता. अशा वेळेस या पुलाचा वैद्यकीय वापरासाठी खुला मार्ग देणे ही गरज बनली आहे.

नितिन सोनार यांनी समाजहिताच्या दृष्टिकोनातून ही बाब गांभीर्याने घेतली आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निवेदन देत रुग्णवाहिकेसाठी पुलावरील मार्ग खुला करण्याची मागणी केली होती. विभागानेही सामाजिक बांधिलकी जपत ही मागणी मान्य केली असून, त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

ही तात्पुरती परवानगी केवळ रुग्णवाहिकांसाठी असून, इतर वाहनांना अजूनही प्रवेश नाही. तथापि, प्रशासनाने या मार्गाचा वैद्यकीय गरजांसाठी प्रभावी वापर करून संभाव्य मृत्यू टाळण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.