Home क्राईम यावल तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम; निकृष्ट दूध-आईस्क्रीमचे आढळले नमुने !

यावल तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम; निकृष्ट दूध-आईस्क्रीमचे आढळले नमुने !

0
9

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल शहरासह किनगाव आणि फैजपूर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी धडक तपासणी मोहीम राबवत विविध ठिकाणी नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथे तपासणीदरम्यान दोन पानटपऱ्यांकडे आवश्यक एफएसएसएआय (FSSAI) परवाना अथवा नोंदणी नसल्याचे आढळून आले. तसेच दोन चहा विक्रेत्यांकडून एकदाच वापरायच्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिक कपांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली. पुढील दंडात्मक प्रक्रियेसाठी संबंधितांना जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, शहरातील काही हॉटेल आणि खाद्य व्यवसायिकांकडून अद्यापही आरोग्यास अपायकारक प्लास्टिक कपांचा वापर सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून अशा व्यावसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यावल शहरात तपासणीदरम्यान एका दूध विक्रेत्याच्या दुधाचा तसेच एका प्रसिद्ध आईस्क्रीम विक्रेत्याच्या उत्पादनाचा नमुना तपासण्यात आला. प्राथमिक तपासणीत हे नमुने निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचे समोर आल्याची माहिती आहे. दुधातील स्निग्धांश (फॅट) आणि इतर आवश्यक घटक निर्धारित प्रमाणापेक्षा कमी असल्यास संबंधित उत्पादनाला अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार निकृष्ट दर्जाचे (Sub-standard) मानले जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये उत्पादन जीवितास अपायकारक असल्याचे आवश्यक नसले तरी गुणवत्ता निकष पूर्ण न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

फैजपूर परिसरातही अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी कारवाई केली असून संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार प्रत्येक अन्न व्यवसायिकाकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे. तसेच अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी प्रतिबंधित किंवा आरोग्यास अपायकारक साहित्याचा वापर टाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंड, परवाना निलंबन तसेच अन्य कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound