पातोंड्यात उलटा फडकला राष्ट्रध्वज; ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथे स्वातंत्र्य दिनी उलटा ध्वज फडकावण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहण करण्यात आले. यंदा सामूहिक झेंडा वंदनाला परवानगी नसल्याचे फिजीकल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आज तालुक्यातील पातोंडा येथे सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी संरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर झेंडा चक्क उलटा फडकावण्यात आल्याचे उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पातोंडा येथील ग्रामसेवक बी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाची तयार करण्यात आल्यामुळे सर्वांना त्यांना हा प्रकार घडलाच कसा ? अशी विचारणा केली. यावरून बराच काळ मोठा गोंधळ उडाला.

या प्रकरणावरून ग्रामसेवकाने माफी मागावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावर बी.वाय. पाटील यांनी माफी मागण्यास नकार दिला. यावरून पातोंडा येथे खूप गोंधळा उडाला. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी संबंधीत ग्रामसेवकाची गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

या संदर्भात उपसरपंच सोपान लोहार, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, भुरा संदानशिव, सागर मोरे, चंद्रशेखर लोहार, प्रकाश पाटील, गिरीश पवार, राहुल पाटील, प्रविण लाड, किशोर देवरे, नितीन बिरारी, नरेश पाटील, दिलीप बोरसे, अविनाश बोरसे, दिनेश पाटील, मोहित पाटील, भूषण पाटील, भगवान पाटील, रोहित पाटील व अविनाश पाटील यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी ग्रामसेवकावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच ग्रामसेवकाला निलंबीत करण्याची मागणी देखील या तक्रारीत करण्यात आलेली आहे.

Protected Content