Home Cities अमळनेर धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ ; हरित विकासाचा ऐतिहासिक श्रीगणेशा

धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ ; हरित विकासाचा ऐतिहासिक श्रीगणेशा

0
6

कळमसरे/धार, ता. अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या धार येथील शिवटेकडीच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी ८ ऑगस्ट रोजी तब्बल १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, प्रशासन तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने हा उपक्रम लोकसहभागातून साकारलेला ऐतिहासिक पर्यावरणीय सोहळा ठरला.

मारवड व परिसर विकास मंच तसेच धार–मालपुर विकास मंच यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या महावृक्षारोपणातून धार गावाने अमळनेर तालुक्यासमोर पर्यावरण संवर्धनाचे लोकसहभागावर आधारित आदर्श मॉडेल उभे केले आहे. शिवटेकडीच्या हिरवाईसाठी ग्रामस्थांनी घेतलेले श्रमदान, नियोजन आणि विविध स्तरांतून मिळालेले सहकार्य यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव मंदिरापासून शिवटेकडीपर्यंत भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. संत सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेर यांचे भजनी मंडळ, धार–मालपुरचे भजनी मंडळ, शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरेचे लेझीम पथक, महिला मंडळ तसेच कै. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर कळस घेऊन दिंडीत सहभागी झाल्या. पर्यावरणविषयक गीते, अभंग आणि घोषणांनी शिवटेकडीचा परिसर दुमदुमून गेला.

वृक्षदिंडी शिवटेकडीवर पोहोचल्यानंतर स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. वृक्षारोपणाच्या वेळी उपस्थितांनी सामूहिकपणे “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जयघोष केला. त्यानंतर “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाच्या तालावर १००८ रोपांची लागवड करण्यात आली. अभंगांचे स्वर, पर्यावरणाच्या घोषणा आणि ग्रामस्थांचा उत्साह यामुळे संपूर्ण शिवटेकडीवर भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमामागे श्री. गणेश तात्या पाटील यांच्या अथक प्रयत्नांना आयकर आयुक्त, नागपूर श्री. संदीपकुमार साळुंखे यांची मोलाची साथ लाभली. शिवटेकडीचा ऐतिहासिक व धार्मिक संदर्भ, टेकडीच्या विकासाची पार्श्वभूमी तसेच वृक्षारोपणापर्यंत झालेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती गणेश तात्या पाटील यांनी उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ते आयकर आयुक्त, नागपूर श्री. संदीपकुमार साळुंखे यांनी मांडलेले शिवटेकडीच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन. केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर पुढील पाच वर्षांत शिवटेकडीवर तब्बल १० हजार रोपे लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी ध्यानमंदिर, भव्य शिवमंदिर, लायब्ररी, विविध स्पर्धा व भरती प्रक्रियेच्या तयारीसाठी अभ्यास साहित्य आणि सुविधा, ओपन जिम तसेच पर्यावरणपूरक आणि आकर्षक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा विकास आराखडाही त्यांनी मांडला. या विकास आराखड्यामुळे शिवटेकडीला भविष्यात धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याची दिशा मिळू शकते. हिरवाईने नटलेली टेकडी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि नागरिकांसाठी आरोग्य व पर्यटनाच्या संधी निर्माण करण्याचा संकल्प या उपक्रमाला व्यापक स्वरूप देणारा ठरला. कार्यक्रमाला प्रांताधिकारी श्री. मयूर भंगाळे, डीवायएसपी श्री. विनायक कोते आणि तहसीलदार श्री. सुराणा यांची उपस्थिती होती. डीवायएसपी विनायक कोते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सायबर फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांनी कशाप्रकारे सावध राहावे, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सौ. जयश्री अनिल पाटील यांनी आमदार महोदयांच्या वतीने शिवटेकडीच्या विकासासाठी आवश्यक त्या विविध बाबींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विकास मंचाच्या पाठीशी उभे राहून शिवटेकडीच्या विकासासाठी आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रमुख उपस्थिती लावत उपक्रमाला सहकार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनपाल श्रीमती बी. एन. चव्हाण, वनरक्षक श्रीमती अलका पाटील, वनरक्षक श्री. जगदीश ठाकरे तसेच वनपाल श्री. आर. व्ही. सोनवणे यांची उपस्थिती होती.

या महावृक्षारोपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अमळनेर तालुक्यातील आणि शहरातील समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, विविध सामाजिक घटक आणि सर्व स्तरांतील नागरिक एका पर्यावरणीय ध्येयासाठी एकत्र आले. कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा कार्यक्रम न मानता संपूर्ण समाजाचा उपक्रम म्हणून सर्वांनी सहभाग घेतला. विविध राजकीय विचारांचे आणि सामाजिक स्तरांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येऊन पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र उभे राहिल्याने या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले. मारवड व परिसर विकास मंचचे प्रमुख कार्यकर्ते श्री. विजय बापू भदाणे, निवृत्त अभियंता, अध्यक्ष राकेश गुरव आणि सचिव देवेंद्र साळुंखे यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. धरतीमाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांच्यासह महिला शेतकरी गटातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला, युवक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. इतक्या मोठ्या लोकसहभागातून पार पडलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण गौरव शुक्ला आणि गणेश पाटील यांनी केले. विशेष छायाचित्रकारांच्या माध्यमातूनही कार्यक्रमाची छायाचित्रे आणि दृश्य नोंद करण्यात आली. झेप साउंड सिस्टिमचे मालक शशिकांत पाटील यांनी कार्यक्रमासाठी ध्वनिव्यवस्था उपलब्ध करून दिली.

या उपक्रमाने इतर गावांनाही प्रेरणा दिली. तीन वेगवेगळ्या गावांतील नागरिकांनी प्रत्यक्ष शिवटेकडीवर येऊन आयोजकांशी संवाद साधला आणि या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यामुळे धारच्या शिवटेकडीवर सुरू झालेली हरित चळवळ भविष्यात अमळनेर तालुक्यातील इतर गावांमध्येही पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना चालना देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण उपक्रमाचे खरे बळ ठरले ते धार–मालपुर ग्रामस्थांचे श्रमदान, नियोजन आणि सहकार्य. वसंत बापू काटे, अरुण भाईदास पाटील, संजय रामदास पाटील, शरद भालचंद्र पाटील, सोमनाथ रामदास पाटील, संजय शालिग्राम पाटील, स्वप्निल गणेश पाटील, कन्हैयालाल शिवदास पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, जयेश अमृत पाटील, मनोज हिम्मत पाटील, समाधान गोकुळ पाटील, दिलीप लहू पाटील, विलास रमेश खैरनार, यशवंत शंकर पाटील, अमोल यशवंत पाटील सर आणि मिलिंद सुरेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी श्रमदान तसेच विविध स्वरूपाची मदत केली.

ग्रामस्थ आणि संयोजन समितीने केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे गावपातळीवर लोकसहभागातून मोठा आणि शिस्तबद्ध कार्यक्रम कसा यशस्वी करता येतो, याचा आदर्श निर्माण झाला. शिवटेकडीवरील १००८ रोपांचे भविष्यात मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी केवळ लागवड न करता त्यांच्या संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. धार–मालपुरने “गाव एकत्र आले तर टेकडी हिरवीगार होते” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. शिवटेकडीवरील १००८ वृक्षांचा हा महायज्ञ केवळ एका दिवसाचा वृक्षारोपण कार्यक्रम न राहता सामाजिक, पर्यावरणीय आणि सामूहिक चळवळीची सुरुवात ठरली आहे. पुढील पाच वर्षांत १० हजार वृक्षांचा संकल्प पूर्ण करून शिवटेकडीला हिरवाईने नटलेले, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्यपूर्ण लोकसहभाग आवश्यक राहणार आहे.


Protected Content

Play sound