अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा येथील प्रेमी युगलाच्या क्रूर हत्येप्रकरणी पाच जणांना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दोघांना पाच वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, चोपडा येथे १२ ऑगस्ट २०२२ रोजी भयंकर दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली होती. यात राकेश संजय राजपूत ( वय २२, रा. रामपुरा, चोपडा ) आणि वर्षा समाधान कोळी ( वय २०, रा. सुंदरगढी, चोपडा ) या युगलास क्रूरपणे संपविण्यात आले होते. या दोघांचे एकमेकांवर प्रेम असले तरी मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. यातून हे दोन्ही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांनाच त्यांना मुलीच्या घरच्यांनी पाठलाग करून पकडले. यानंतर राकेशला गोळ्या मारून तर वर्षा हिचा गळा आवळून खून करण्यात आला होता.
या प्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अमळनेरच्या सत्र न्यायालयात हा खटला चालला. यात २१ साक्षीदारांची तपासणी घेण्यात आली. यानंतर न्यायाधिशांनी सोमवारी आनंदा आत्माराम कोळी ( वय ५६); रवींद्र आनंदा कोळी ( वय २०); तुषार आनंदा कोळी ( वय २३); भरत संजय रायसिंग ( वय २२) आणि शांताराम उर्फ बंटी अभिमन कोळी ( वय १९) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दरम्यान, या खटल्यात ऍड. नितीन मंगल पाटील यांनी आरोपींना पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिल्याची माहिती देखील तपासात समोर आली होती. तसेच पवन माळी याने पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती. यामुळे त्यांना देखील सहआरोपी करण्यात आले होते. या दोघांना न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावली.